पुणे जिल्हा | मंचरजवळचा उजवा कालवा कोरडा ठणठणीत

मंचर, (प्रतिनिधी) – मागील अनेक दिवसांपासून परतीच्या मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे,अशी मागणी शेतकऱ्यांसह खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
मागे अनेक दिवसांपासून माघारी मान्सूनचा पाऊस आंबेगाव तालुक्यामध्ये बरसला नाही. पाऊस न आल्याने शेती पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.अनेक ठिकाणी विहिरी,तळे, नदी यावरून पाणी उपसा करून शेती पिकांना दिले जात आहे.
परंतु डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या काठावरील गावांमध्ये अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी कमी आहे.त्यामुळे या ठिकाणाच्या गावातील पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे उजव्या कालव्याला पाणी सोडावे.
अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावर आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावे बागायती झाली आहेत. या ठिकाणी तरकारी पिके, जनावरांची चारा पिके तसेच ऊसासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सध्या पाण्याची गरज भासत आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली आहेत. अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे.
त्यामुळे एकंदरीत या परिसरामध्ये पाण्याची गरज निर्माण झाली असून उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.





