Ricky Ponting : बुमराह नाही, गिलच का सर्वोत्तम कसोटी कर्णधार? रिकी पॉन्टिंगने सांगितले कारण

Ricky Ponting on Shubman Gill and Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा असा विश्वास आहे की भारताने शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवून योग्य निर्णय घेतला आहे. आता या तरुण फलंदाजाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी दीर्घकालीन संधी दिली पाहिजे. रिकी पॉन्टिंगला आशा आहे की भारतीय संघ सध्याच्या बदलाच्या टप्प्याला इतर देशांपेक्षा चांगल्या प्रकारे हाताळू शकेल.
कर्णधारपदासाठी गिल हा सर्वोत्तम पर्याय का आहे?
आयसीसी शोमध्ये बोलताना रिकी पॉन्टिंगने गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवण्याचे समर्थन केले. तो म्हणाला, “माझ्या मते, शुबमन गिलला कर्णधार बनवणे हा योग्य निर्णय आहे. मला माहिती आहे की या शर्यतीत इतर अनेक नावे होती. क्रिकेट पंडित म्हणतात की बुमराहला दुर्लक्ष करून गिलला कर्णधारपद का देण्यात आले हे त्यांना समजत नाही. तथापि, माझ्या मते ते अगदी सोपे आहे.”
बुमराहला कर्णधार न करण्याचा निर्णय योग्य का होता?
रिकी पॉन्टिंग पुढे म्हणाला, “बुमराह गेल्या काही वर्षांपासून दुखापतींमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला बुमराहला कर्णधार बनवायचे नाही. तुमचा कर्णधार असा नसावा जो काही सामने खेळतो आणि काहींमध्ये बाहेर बसतो. म्हणूनच मला हा निर्णय अगदी योग्य वाटला. आता शुबमनला कर्णधार बनवण्यात आले आहे, त्यामुळे त्याला बराच काळ पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे शानदार नेतृत्व केले. माझ्या मते, कर्णधारपद त्याला शोभते.”
इंग्लंड दौरा गिलसाठी मोठी परीक्षा असेल –
इंग्लंड दौरा शुबमन गिलसाठी फलंदाज आणि कर्णधार म्हणून मोठी परीक्षा असेल. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघात अनुभवाचा अभाव आहे. बुमराहला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नसली तरी, इंग्लंडच्या भूमीवर जस्सीची भूमिका खूप महत्त्वाची असेल. बुमराहला इंग्लंडची माती खूप आवडते. गेल्या दौऱ्यात त्याने चेंडूने प्रचंड कहर केला होता.





