रिक्षाचालकांना लॉकडाऊनच्या अफवांची धास्ती

घरभाडे, लाइटबिल, बॅंक हप्ते, शाळेची फी भरणे होतेय कठीण
पिंपरी – वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी कारवाई, बॅंकेकडून येणारे धमकीवजा कर्जवसुलीचे फोन, भरमसाट येत असलेले वीजबिल, शाळेची फी आणि घरखर्च याचा ताळमेळ कसा बसवायचा, या विवंचनेत रिक्षाचालक असतानाच पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरवल्या जात असल्याने रिक्षाचालकांना धडकी भरली आहे. रोज अवघ्या 200 ते 300 रुपयांच्या कमाईतून संसाराचा गाडा कसा हाकायचा, या विवंचनेत पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक जगत आहेत.
शहरात रिक्षांच्या माध्यमातून हजारो चालक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; परंतु करोना विषाणूचा संसर्ग आणि बॅंकेच्या कर्जवसुली प्रकाराने त्यांचे व कुटुंबीयांचे जगणे कठीण झाले आहे. करोनामुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला. आता हळूहळू शिथिलता आल्याने रिक्षाचालकांचे व्यवसाय सुरळीत होत आहे. परंतु अजूनही सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू नसल्याने त्याचा रिक्षा वाहतुकीवरसुद्धा परिणाम होत आहे.
रोज फक्त 200 ते 300 रुपयांची कमाई होते. एवढ्या कमाईत रिक्षाचा गॅस, वाहतूक पोलिसांची चिरीमिरी, आरटीओची कारवाई, बॅंकेचा हप्ता, मुलांच्या शाळेची फी, भरमसाठ वाढलेले लाईट बिल, औषधपाणी, घरभाडे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न रिक्षाचालकांना पडला आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत आहे. तिकडे दुसरी लाट सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा या लाटेची शक्यता असल्याने सरकार खबरदारी घेत आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू झाल्यास कुटुंब कसे चालवायचे, अशी चिंता रिक्षाचालकांना भेडसावत आहे. अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत असलेल्या रिक्षाचालकांनी सरकारने मदत करवी, अशी मागणी शहरातील विविध रिक्षा संघटनांनी यापूर्वीच शासनाकडे केली आहे.
“लॉकडाऊनमध्ये बॅंकेचे “हप्ते’ थकलेले आहेत. त्यासाठी बॅंकेकडून सारखे फोन येत असून, बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून थेट लायकी काढली जाते. मुलगा शाळेत गेलेला नसतानाही शाळेची संपूर्ण फी भरावी लागते. वाढीव वीजबिल आले आहे. रोज 8-9 तास रिक्षा चालवून त्यामधून मिळणाऱ्या 200 ते 300 रुपयांत हे कसे भागवयाचे? किमान बॅंकेने तरी कर्जबाजारी असलेल्या रिक्षाचालकांच्या बाबतीत तरी माणुसकी दाखवावी.”
– काशिनाथ शेलार, रिक्षाचालक





