भारतीय महिला संघाची धाकडं फलंदाज आणि यष्टीरक्षक रिचा घोष हिने आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांनाच भुरली घातली आहे. महिला क्रिकेटमध्ये रिचाप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करणारे खेळाडू खूप आहेत. त्यामुळेच तिची ही फलंदाजीची शैलीच तिला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं बनवते. सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत रिचाची जबरदस्त खेळी सर्वांनाच पाहावयास मिळाली आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने सहज विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान भारताने दमदार खेळ करत पाहुण्यांना सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये ५ धावांनी मात दिली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत १ बाद १८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. यावेळी भारताकडून फलंदाजीसाठी रिचा घोष आणि स्मृती मंधाना या मैदानात उतरल्या. रिचाने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, यानंतर दुसऱ्या चेंडूवर तिचा फटका चुकला आणि ती झेलबाद झाली. तिसरा चेंडू खेळण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात आली आणि तिने १ धाव घेत मंधानाला स्ट्राईक दिली. यानंतर मंधानाने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तिने चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर ३ धावा घेत संघाला २१ धावांवर पोहोचवले.
सामन्यात भारतीय संघ अत्यंत अडचणीत असताना बिनधास्त शैलीत फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष हिने भारताच्या विजयात मोलाचा वाट उचलला. रिचाने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की,”सुपर ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यासाठी मंधानाने मोठी मदत केली. त्यामुळेच मी पहिल्या चेंडूवर षटकार मारू शकले. मी नेहमीच आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असते. सामन्यात शेवटपर्यंत टिकून राहून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करते.” असे रिचाने म्हटले आहे.
“मी दिग्गज एमएस धोनी याला पाहून मोठी झाली, तो प्रचंड दबावाखाली मॅच फिनिशिंग कारनाम्यासाठी ओळखला जात होता. लहानपणापासून मी धोनीला फॉलो केले आहे. माझ्या वडिलांनी (मानबेंद्र घोष) माझी पॉवर हिटिंग कौशल्ये वाढवण्यासाठी खूप मदत केली, ते माझ्याबरोबर सर्वत्र जायचे. मात्र मी अद्याप माझा आदर्श धोनीला भेटू शकले नाही. मला अजून त्याला भेटण्याची संधी मिळाली नाही. आशा आहे की मी त्याला कधीतरी भेटेन.” अशी इच्छादेखील रिचाने व्यक्त केली आहे.
🗣️ 🗣️ @msdhoni and my father have been my inspirations: @13richaghosh #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/47Xlouwnd7
— BCCI Women (@BCCIWomen) December 13, 2022
टी-२० मालिकेचे वेळापत्रक
१. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
२. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
३. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
४. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
५. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून