कोयना प्रकल्पाला संजीवनी ! जलसंपदा व ऊर्जा विभागात झालेल्या सामंजस्य करार; १३३६ कोटी निधी

विजय लाड –
कोयनानगर (प्रतिनिधी) – कोयना जलविद्युत प्रकल्पाचा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा व दहा वर्षांपासून सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे रखडलेल्या कोयना धरणाच्या डावा तीरावर उभारण्यात येणाऱ्या पायथा वीजगृह उभारणीच्या कामाला जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या बहुउद्देशीय प्रकल्पाला संजीवनी मिळाली आहे.
जलसंपदा व महानिर्मिती कंपनी यांच्यामध्ये कोयना डावा तीर धरण पायथा उदंचन जलविद्युत गृह उभारणी करता सामंजस्य करार झाला असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १३३६ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहॆ. चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारवर महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन् बलगन यांनी तर जलसंपदा विभागातर्फे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी स्वाक्षरी केली.
कोयना धरण पायथा येथे ४० मेगावॅट क्षमतेचे दोन उदंचन जलविद्युत संच उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्प उभारणीचे प्राथमिक काम जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे. तर उर्वरित प्रकल्प उभारणी महानिर्मिती व जलसंपदातर्फे संयुक्तरित्या पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा व उर्वरित कामाचा कोयना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप यांनी पाठपुरावा केला असून येणाऱ्या चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला तसेच महानिर्मितीतर्फे संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक पंकज नागदेवते, मुख्य अभियंता (प्रकल्प नियोजन) अतुल सोनजे व वरिष्ठ अधिकारी तसेच जलसंपदा विभागातर्फे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता व सहसचिव प्रसाद नार्वेकर, अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप उपस्थित होते.





