Pimpri : ‘एचएमपीव्ही’बाबत आढावा बैठक

पिंपरी : राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेत ‘एचएमपीव्ही’बाबत आढावा बैठक घेण्यात आली. आमदार महेश लांडगेआणि आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे ‘सर्वेक्षण’ करण्यातबाबत चर्चा करण्यात आली.
ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता आणि खबरदारीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवन येथे आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरात संसर्गजन्य आजाराबाबत प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यात आल्यास त्यांची स्वतंत्र नोंद ठेवावी. अशा रुग्णांची संख्या आणि त्यांची लक्षणे यावर बारकाईने लक्ष ठेवले जावे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे का? आणि त्यांच्यात इतर कोणती लक्षणे दिसून येत आहेत का? याची तपासणी व्हावी. तसेच, शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णाचे सर्वेक्षण करावे.





