मुळशी तालुक्यात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान ‘महसूल सप्ताह’चे आयोजन

पौड: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २९ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, नागरिकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने मुळशी तालुक्यासह संपूर्ण राज्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे.
या सप्ताहाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासनाशी संबंधित विविध योजना आणि सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. मुळशी तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग घेऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी केले आहे.
महसूल सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम –
१ ऑगस्ट २०२५: महसूल सप्ताहाचा शुभारंभ-
महसूल सप्ताहाचा प्रारंभ १ ऑगस्ट रोजी होणार असून, यानिमित्ताने कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल. तसेच, लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप होईल. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ अंतर्गत प्रकरणे ‘ई-हक्क’ पोर्टलद्वारे स्वीकारली जातील.
२ ऑगस्ट २०२५: अतिक्रमण नियमानुकूल करणे-
या दिवशी ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नियमानुकूल करून पात्र कुटुंबांना जागेचे पट्टे वाटप केले जाईल. यामुळे अनेक कुटुंबांना कायदेशीर मालकी हक्क मिळण्यास मदत होईल.
३ ऑगस्ट २०२५: पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त-
‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल.
४ ऑगस्ट २०२५: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान-
प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमधून नागरिकांना आधार कार्ड, जात, उत्पन्न, अधिवास यांसारखे आवश्यक दाखले आणि ओळखपत्रांचे वाटप केले जाईल. तसेच, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची कार्यवाही केली जाईल.
५ ऑगस्ट २०२५: विशेष सहाय्य योजना लाभार्थी मोहीम-
विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) झालेले नाही, अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन DBT प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकांची KYC पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाईल.
६ ऑगस्ट २०२५: शासकीय जमिनींचे संरक्षण –
या दिवशी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढली जातील. शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत धोरणानुसार नियमानुकूल करणे किंवा त्या सरकारजमा करण्याचा निर्णय घेतला जाईल. कूळ कायद्यानुसार १० वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील शर्तीचा शेरा कमी करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
७ ऑगस्ट २०२५: M-sand धोरण अंमलबजावणी व सप्ताह सांगता-
कृत्रिम वाळू (M-sand) धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निश्चित कार्यप्रणालीनुसार कार्यवाही केली जाईल. सप्ताहाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या वेळी उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाईल.
नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन-
महसूल सप्ताहात मुळशी तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी आहे. अतिक्रमण नियमानुकूल करणे, दाखले मिळवणे, शासकीय जमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांना मदत, आणि शिधापत्रिकांची KYC यांसारख्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी आवाहन केले आहे.
या सप्ताहाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून, नागरिक आणि शासन यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





