Shankar Mandekar : मुळशीच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या! आमदार शंकर मांडेकर यांचे आवाहन
Shankar Mandekar : नदी सुधार प्रकल्पांतर्गत साडेसहाशे कोटींचा निधी मंजूर; लवळे आणि पिरंगुटच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा मोठा शब्द.

Shankar Mandekar – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे मुळशी तालुक्याला गेल्या दीड वर्षात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मिळाला असून, त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली आहेत. ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आमदार शंकर मांडेकर यांनी केले.
लवळे (ता. मुळशी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट दौर्यात ते बोलत होते. यावेळी पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शांताराम इंगवले, पिरंगुट गणाचे उमेदवार रमेश पवळे, भूगाव गणाचे उमेदवार राजेंद्र दबडे, लवळे गावचे सरपंच रंजित राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मांडेकर यांनी पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी खारावडे, उरावडे, भुकूम व लवळे येथे सभा घेतल्या.आमदार शंकर मांडेकर म्हणाले, गेल्या दीड वर्षात अनेक विकासकामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
पिरंगुट व लवळे या गावांसाठी नदी सुधार प्रकल्पांतर्गत मलनिसारण योजनेसाठी साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.विकासाबरोबरच गावचे गावपण टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र घेऊन विकासकामे पूर्ण केली जातील.
ज्या विश्वासाने नागरिकांनी विधानसभेला साथ दिली, त्याच विश्वासाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. हीच स्वर्गीय अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कुदळे, माजी सरपंच संजय सातव यांनीही मनोगत व्यक्त केले.





