Nagar | महसुली सेवांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा :

नगर (प्रतिनिधी) – महसुल विषयक सेवा सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट, २०२४ दरम्यान महसुल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या महसुल सप्ताहामध्ये पात्र लाभार्थ्यांनी महसुली सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
महसुल सप्ताहाचा दि. १ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा होऊन कुटुंबातील त्यांची भूमिका मजबुत व्हावी यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये अन्य संवेदनशील भागात तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक यांना व त्यांच्या कुटूंबियांना आवश्यक असणारे व महसुल कार्यालयाकडुन निर्गमित करण्यात होणारे विविध दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडुन प्राप्त अर्जांवर 5 ऑगस्ट रोजी कार्यवाही करण्यात येणार आहे.
संरक्षण दलामध्ये कार्यरत असताना शहिद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांची घर, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना व्हावा, यासाठी आवश्यक असणारी अधिवास प्रमाणपत्र,
आधारकार्ड आदी कागदपत्रे तातडीने उपलब्ध होण्यासाठी २ ऑगस्ट, 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच संबंधित तालुक्याचे उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.





