मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत करा; ग्राहक आयोगाचे आदेश

पुणे – मुदतठेव परिपक्व झाल्यानंतरही गुंतवलेली रक्कम तसेच व्याज देण्यास टाळाटाळ करणार्या सॉइल प्रॉपर्टीज् अॅण्ड इन्फ्रा इंडिया या कंपनीसह तिच्या तीन संचालकांना पुणे जिल्हा ग्राहक आयोगाने दणका दिला आहे.
ठेव परिपक्व झाल्याच्या तारखेपासून आदेशाच्या तारखेपर्यंत पाच टक्के व्याज दराने देण्यात यावेत. याखेरीज, मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये तसेच तक्रार अर्जाच्या खर्च म्हणून सात हजार रुपये 45 दिवसांच्या आत देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले. ही सेवेतील त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढत अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे व सदस्या सरीता पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
तक्रारदार हे चिखली येथील रहिवासी असून ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याच्या वतीने अॅड. ज्ञानराज संत यांनी ग्राहक आयोगात बाजू मांडली. जानेवारी 2013 ते डिसेंबर 2018 दरम्यान स्व-कष्टाच्या कमाईमधील एक हजार रुपये ते दर महिन्याला सॉईल प्रॉपर्टींज् अॅण्ड इन्फ्रा इंडियाच्या आवर्ती ठेव खात्यात जमा करत होते. कंपनीने खाते परिपक्व झाल्यानंतर 97 हजार देण्याचे कबूल केले. त्यानंतर कंपनीने त्यांना आणखी एक ऑफर सांगितली.
तक्रारदार यांनी कंपनीवर विश्वास ठेऊन ऑक्टोंबर 2017 मध्ये खाते परिपक्व झाल्यानंतर त्यातील 97 हजार रुपये तीन वर्षांकरीता मुदत ठेव म्हणून ठेवले. यावेळी, कंपनीने जानेवारी 2021 पर्यंत 1 लाख 94 हजार रुपये देण्याचे कबूल करत पावती दिली. ठेव परिपक्व झाल्यानंतर त्यांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली.
मात्र, कंपनीकडून ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर, त्यांनी कंपनीसह तीन संचालकांना कायदेशीर नोटीस पाठविली. मात्र त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आयोगात धाव घेतली होती. आयोगातही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांच्या युक्तीवादानंतर आयोगाने निकाल दिला.
“कंपनीसह अन्य व्यक्तींनी याप्रकारे आठ ज्येष्ठ नागरिकांना पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. त्यांच्यावतीनेही आयोगात बाजू मांडण्यात आली. याच प्रकारचे आदेश अन्य प्रकरणातही झाले असून आयोगाच्या आदेशामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.” – अॅड. ज्ञानराज संत, तक्रारदारांचे वकील.





