Pune News : शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरु करा; मराठा क्रांती मोर्चाची मंत्री विखेंकडे मागणी

पुणे : महाराष्ट्र सरकारने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना बंद केल्याने मराठा समाजात नाराजी पसरली आहे. विशेषतः मराठा समाजातील साडेतीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी ८०० रुपये मासिक शिष्यवृत्ती बंद झाल्याने मराठा क्रांती मोर्चा, पुणे शहराने तीव्र निषेध नोंदवला आहे. या संदर्भात मोर्चाने मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करून ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची मागणी
पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी सांगितले की, ही शिष्यवृत्ती मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची होती. “ही योजना बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा,” असे निवेदनात नमूद केले आहे.
मंत्री विखे पाटलांचे आश्वासन
यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना म्हटले, “या शिष्यवृत्ती योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन कायदेशीर मार्गाने ती पुन्हा सुरू करता येईल का, याची पडताळणी करू. मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळेल.” त्यांनी तपास समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.





