पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांना एक महिना पूर्ण झाला असून, जवळपास पन्नास टक्के परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. या ऑनलाइन परीक्षांच्या निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. 15 मेपर्यंत सर्व विषयांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली. काही विद्याशाखांच्या परीक्षा पूर्ण होऊन अनेक दिवस झाल्याने आता या परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित विभागांकडे पाठवण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया या आठवड्यातच सुरू करण्यात येत आहे. यासंबंधिची सविस्तर माहिती आणि निकालाची तारीख विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचे तांत्रिक अडथळे येत नसून, प्रॉक्टर्ड पद्धतीला विद्यार्थी सरावले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकारही कमी झाले असून, विद्यार्थी वेळेत परीक्षा पूर्ण करत असल्याचे सांगण्यात आले आहे.