Raj Thackeray : “फेररचना म्हणजे राज्यांना कमकुवत करण्याचे कारस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारताचे नुकसान होणार” – राज ठाकरे
या विधेयकानुसार, महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभांमधील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवली जाणार आहे.

Raj Thackeray – केंद्र सरकार मतदारसंघ फोररचनेच्या नावाखाली राजकीय सत्तेचे संतुलन बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांवर गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. कल्याण येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावामागच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सध्याचे ५४३ खासदार अपेक्षित काम करत आहेत का?, खासदारांची संख्या वाढवण्याची गरजच काय आहे?, असा सवाल त्यांनी केला. तसेच, अशा विस्तारानंतर राज्यांना आर्थिक स्वायत्तता आणि अधिक अधिकार मिळतील का, हे केंद्राने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. हे सर्व राज्यांना स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचे आणि संपूर्ण देशाला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे कारस्थान आहे, असे ते म्हणाले.
राज्यांच्या प्रतिनिधित्वावर होणारा परिणाम तपासल्याशिवाय केवळ जागा वाढवल्याने लोकशाही बळकट होणार नाही. उत्तर भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व वाढल्यामुळे उत्तर-दक्षिण दरी निर्माण होऊ शकते, अशी चिंता ठाकरे यांनी व्यक्त केली.
केवळ लोकसंख्येच्या आधारावर केलेली फेररचना ज्यामध्ये दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचा विचार केलेला नाही, ते दक्षिण राज्यांसाठी, तसेच महाराष्ट्रासाठी अन्यायकारक ठरू शकते.
केंद्र सरकार राज्यांचे आर्थिक आणि राजकीय अवलंबित्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असा त्यांनी आरोप केला. केंद्र सरकार सोमवारी लोकसभेत एक नवीन घटनादुरुस्ती विधेयक मांडणार आहे. या विधेयकानुसार, महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभांमधील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवली जाणार आहे.
शरद पवारांवर टीका
त्यांनी जंतरमंतर येथे राष्ट्रवादी काँग्रेस(शप) चे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेली आपली जुनी टिप्पणी आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती, तेव्हा सोशल मीडियावर केलेली पोस्टही आठवण करून दिली. पहिली तुकडी निघून गेली आहे आणि दुसरीही लवकरच मागे जाईल, असे त्यांनी तेव्हा म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे सूचित करत, त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की, होकायंत्र दिशा दाखवते, पण हे तर धोका यंत्र आहे. ठाकरे यांनी नागरिकांना निवडणुका कशा लढवल्या जातात, यावर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले.






