मतदारांना ‘पेटीएम’द्वारे पैसे पाठविण्याचा संशय; ‘ईडी’कडे तक्रार करण्याचा चंद्रकांत पाटलांचा इशारा

कोल्हापूर – देशात सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची, असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “हिंदू म्हणजे बुरसटलेले’ असे सातत्याने पुस्तके, शिक्षण व भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये हे केवळ हिंदूनी सांभाळले पाहिजे, असे झाले. पण सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा, पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू. आपण एकत्र प्रेमाने राहू. पण सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तसेच मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
ईडीकडे तक्रार करणार
कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मतदारांच्या बॅंक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बॅंक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचा संशय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लॉंडरिंग आहे. असा मनी लॉंडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.





