व्यापार्यांकडील गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध आणखी कडक; नवे नियम 31 मार्च 2025 पर्यंत लागू

नवी दिल्ली – गव्हाची आवश्यकतेपेक्षा जास्त साठेबाजी होऊन किमती वाढू नयेत याकरिता केंद्र सरकारने व्यापार्याकडील गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. हे नवे नियम 31 मार्च 2025 पर्यंत लागू राहतील.
नव्या नियमानुसार घाऊक व्यापार्यांना 2,000 ऐवजी फक्त 1,000 टन गहू बाळगता येईल. किरकोळ व्यापार्यांना दहा टना ऐवजी पाच टन गहू बाळगता येईल. तर मोठ्या शृखलांना दहा टन ऐवजी पाच टन गहू बाळगता येईल. प्रक्रिया करणार्या उद्योगांना त्यांच्या मासिक क्षमतेच्या 60 ऐवजी 50% पर्यंत गहू बाळगता येईल.
एप्रिल 2025 पर्यंत सर्वांनी या नियमाचे पालन करणे अपेक्षित आहे. गव्हाच्या किमती वाढू नयेत आणि साठेबाजी होऊ नये यासाठी गव्हाच्या साठ्यावर 24 जून रोजी प्रथम मर्यादा आणला होत्या. त्यानंतर त्यात 9 सप्टेंबरला वाढ केली होती. आता पुन्हा या कालमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
अन्न मंत्रालयाने सांगितले की, सर्वांनी आपल्याकडील साठा अन्न मंत्रालयाच्या वेबसाईटवर नमूद करावा. यात दर शुक्रवारी आवश्यकते बदल नोंदविले जावेत. सध्या कोणाकडे जास्त गव्हाचा साठा असले तर पंधरा दिवसाच्या आत तो संबंधित मर्यादेच्या आत आणावा.




