LPG Tanker Shivalik: ‘शिवालिक’ एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात दाखल; ‘नंदादेवी’ भारताच्या दिशेने मार्गस्थ
LPG Tanker Shivalik: जहाजबांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये मिळून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी वायू आहे.

LPG Tanker Shivalik: इराण-अमेरिका युद्धामुळे धोकादायक बनलेली होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताचे ‘शिवालिक’ हे एलपीजी टँकर सोमवारी (दि. १६ मार्च) गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले. इराण सरकारने भारताच्या दोन एलपीजी टँकरना होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी शिवालिक बंदरात पोहोचले असून ‘नंदादेवी’ हे दुसरे जहाज भारताच्या दिशेने वाटचाल करत असून ते १७ मार्च रोजी भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी –
जहाजबांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये मिळून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी वायू आहे. “पर्शियन गल्फमध्ये एकूण २४ भारतीय जहाजे असून ती होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत. सर्व जहाजे सुरक्षित आहेत. यापैकी शिवालिक आणि नंदादेवी या दोन जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी देण्यात आली,” असे सिन्हा यांनी सांगितले.
#WATCH | Gujarat: LPG tanker Shivalik, which crossed the Strait of Hormuz, reaches Mundra Port. pic.twitter.com/tVXvWunqba
— ANI (@ANI) March 16, 2026
जयशंकर यांनी तेहरानशी साधला थेट संवाद –
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात तेहरानबरोबर थेट संवाद साधल्याची माहिती दिली. मध्यपूर्वेत संघर्ष उफाळलेला असताना भारतीय जहाजांची सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तेहरानबरोबर सुरू असलेला संवाद सकारात्मक असून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
इराणने दिले सहकार्य –
इराणी सर्वोच्च नेते यांच्या जवळचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. “आमच्याकडून भारतीय जहाजांना बाहेर पडण्यासाठी सहकार्य केले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.





