बंगालमध्ये बाहेरून येणाऱ्या गुंडांचा प्रतिकार करा!

कोलकता -पश्चिम बंगालमध्ये बाहेरून येणाऱ्या गुंडांचा प्रतिकार करा, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी त्या राज्यातील जनतेला केले. ते वक्तव्य करताना ममतांनी नामोल्लेख टाळला. मात्र, त्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने ममतांवर जोरदार शाब्दिक पलटवार केला.
इतरांवर दहशत निर्माण करण्यासाठी काही लोक केवळ निवडणुकांच्या काळात बंगालमध्ये येतात. राज्यातील शांतता बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विभाजनवादी शक्तीचे रूप असणाऱ्या त्या बाहेरच्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. त्यांच्या विरोधात एकवटायला हवे, असे एका समारंभावेळी ममता जनतेला उद्देशून म्हणाल्या. याआधी ममतांनी बऱ्याचदा भाजपचा उल्लेख बाहेरच्यांचा पक्ष म्हणून केला. साहजिकच, ममतांच्या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. ममता सरकार देशाच्या इतर भागांतील भारतीयांचे स्वागत करत नाही.
मात्र, बांगलादेशी घुसखोरांचे आनंदाने स्वागत केले जाते. त्यातून त्यांचे नैराश्यच उघड होते, असे बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले. बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक तोंडावर आल्याने प्रामुख्याने भाजप आणि ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.





