संदेशखाली प्रकरणात ममतांना मोठा झटका ! शाहजहान शेखला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश

नवी दिल्ली – ईडीच्या अधिकाऱ्यांवर पाच जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यासहीत तेथील अन्य तीन प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने आज दिले. हा निर्णय प. बंगाल सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जाते आहे. तसेच प. बंगाल पोलिसांनी अटक केलेला संदेशखाली येथील तृणमूल कॉंग्रेसचा नेता शाहजहान शेख यालाही सीबीआयच्या ताब्यात देण्यात यावे असे निर्देश न्यायालयाने दिले.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगननम यांनी हे आदेश दिले. तत्पूर्वी संदेशखाली प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आज म्हणजे मंगळवारी न्यायालयाने ती एसआयटी बरखास्त केली आणि हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.
५ जानेवारी रोजी रेशन घोटाळा प्रकरणात तपास करण्याकरता ईडीचे पथक संदेशखाली येथे गेले होते. त्यावेळी शाहजहान शेख याच्या समर्थकांनी पथकावर हल्ला केला होता. त्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले होते आणि आरोपी शाहजहान फरार झाला होता. ५५ दिवसांनंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पाच जानेवारीच्या घटनेनंतर संदेशखालीच्या नागरिकांनी हिंसक निदर्शने केली होती. त्यांनी शाहजहान आणि त्याच्या समर्थकांवर लैंगिक अत्याचाराचे आणि जमीनी बळकावण्याचे आरोप केले आहेत. त्याच्या अवैधरित्या सुरू असलेल्या पोल्ट्री फार्मलाही ग्रामस्थांनी आग लावली. एकूणच बंगालचे वातावरण तापले असून लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला प्रचंड अडचणीत आणणारा ठरला आहे.





