बारामती बँकेच्या ‘त्या’ संचालकांचे राजीनामे; नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी?

बारामती – बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी राजीनामे दिले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राजीनामे दिले गेले आहेत. संचालकांच्या राजीनामामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संचालकांचे राजीनामे शहर तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संचालक मंडळाच्या पुनर्रचनेसाठीच अजित पवार यांनी हे राजीनामे घेतले आहेत की यामागे वेगळेच राजकारण आहे, अशी चर्चा देखील सुरू आहे.
अध्यक्षपदी सचिन सातव हे कायम राहतील मात्र उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने भरीव कामगिरी करत बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला व बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बँकेचे उपाध्यक्षपदी यंदा महिला संचालिकेस स्थान मिळणार का? याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी गेले वर्षभर सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अथक परिश्रम केले होते. बँकेने यंदा सात कोटी नव्वद लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.





