उद्याच्या उद्या राजीनामा द्या; फडणवीसांचा आदेश, अन् मुंडेंचा राजीनामा, ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात चांगलाच तापलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराडला अटक झाली आहे. या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिला असून राज्यपालांनी देखील तो स्वीकारला आहे.
दरम्यान, आपला संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगत धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, दोषी आढळल्यानंतर कुणालाही सोडणार नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा लांबणीवर टाकत होते. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर समोर आलेले भयानक फोटो पाहून राज्यात तीव्र संताप व्यक्त झाला.
त्यानंतर, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याचा आग्रह करत धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला होता. जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर मुंडे यांनी आज राजीनामा दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. यापूर्वी तीन ते चार वेळा अजित पवारांशी त्यांनी तशी चर्चा देखील केली होती. स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला.
राज्यपालांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. अखेर आता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान आता धनंजयम मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हाल हाल करून संतोष देशमुख यांची हत्या
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला निर्घृण हत्या झाली. अपहरण करुन त्यांचे हाल हाल करण्यात आले. लोखंडी पाईप, क्लच वायरने त्यांना बेदम मारले. सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांचा निर्दयीपणे जीव घेतला. या टोळीने केलेली मारहाण इतकी भीषण होती की देशमुख यांचे दीड लीटर रक्त साकळले.
आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी कराड आणि त्याच्या टोळीनं खंडणी मागितली होती. पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यास विरोध केला. त्यातून देशमुख यांच्या हत्येचा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकरणात कराड क्रमांक एकचा आरोप आहे. तो मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा देण्याची मागणी केली जात होती.





