Praniti Shinde | Devendra Fadnavis – सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मयत डॉक्टरच्या कुटुंबाची सांत्वनपण भेट घेतली. यानंतर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती खालच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच, या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटले आहे की, आरोग्य विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस अधिका-यांनी पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला. याशिवाय, या प्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही पोलिस उपनिरीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या आत्महत्या प्रकरणात मृत डॉक्टरवर वरिष्ठांचा मोठा दबाव होता. अधिका-यांनी स्क्रिप्टेड पत्र एक महिन्यानंतर समोर आणले. मात्र मयत डॉक्टरने अनेक तक्रारीचे पत्र वरिष्ठांना दिले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी महिलेला संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारावर खालच्या पातळीवर टीका करण्यातच वेळ वाया घालवला, असा हल्लाबोल त्यांनी केला.