‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर रेश्मा शिंदे दिसणार नव्या मालिकेत; भूमिकेबाबत दिली माहिती

Reshma Shinde : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर रेश्मा आता लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
रेश्मा शिंदेचे ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी नावाचे पात्र असणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, “‘रंग माझा वेगळा’ मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. ही मालिका माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती.”
View this post on Instagram
नव्या भूमिकेविषयी रेश्मा म्हणाली, “जानकी अत्यंत साधी, मनमिळावू आणि सर्वांना समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली साथ देतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली”.
दरम्यान, कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहुल लिंगायत यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केले असून यात सविता प्रभुणे, भक्ती देसाई, सुनील गोडसे, प्रमोद पवार, उदय नेने आणि बालकलाकार आरोही सांबरे दिसणार आहेत.





