आरक्षित प्रवर्ग ‘ईडब्ल्यूएस’ला अपात्र; व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत सीईटीचे स्पष्टीकरण,

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या अर्जांची छाननी सुरु आहे. त्यात आरक्षित प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ‘ईडब्ल्यूएस’ चा लाभ मिळण्यासाठी प्रमाणपत्र सादर केली आहेत. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे, एनटी, एसईबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेता येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी ‘ईडब्ल्यूएस’चे प्रमाणपत्र सादर केले आहेत, त्यांनी अर्जामध्ये योग्य बदल करावे, असे सूचि केले आहे.
सध्या अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीएसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरु आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्ज करताना विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे सीईटीच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. अर्जाच्या छाननीत आरक्षित घटकांतील विद्यार्थ्यांनी ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र सादर केले आहेत.
या आरक्षणातून प्रवेश मिळावी, असे नमूद केले आहे. यामुळे सीईटी सेलने वरील स्पष्टीकरण केले आहे. ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ हा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना ‘ईडब्ल्यूएस’ मधून प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरक्षित प्रवर्गातील ज्यांनी ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र सादर केले आहेत, त्यांनी तक्रार निवारण कालावधीत अर्जामध्ये योग्य बदल करावे. ज्या अभ्यासक्रमांसाठी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाही, त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्जात बदल करावे, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.





