Ranjangaon : मुक्या पक्ष्यांच्या अन्नासाठी एकरभर बाजरीचे पीक राखीव
Ranjangaon : शेतीतील प्रत्येक पिकाला आर्थिक महत्त्व असताना स्वतःच्या उत्पन्नाचा विचार बाजूला ठेवून मुक्या जीवांच्या पोटाची काळजी घेण्याचा मांढरे यांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.

रांजणगाव गणपती : दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या पशुपक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत. पाणी आणि अन्नाच्या शोधात पशुपक्ष्यांची भटकंती सुरू असताना पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील शेतकरी सुनील मांढरे यांनी माणुसकी आणि भूतदयेचे अनोखे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या शेतातील तब्बल एक एकर क्षेत्रावरील बाजरीचे पीक त्यांनी पशुपक्ष्यांच्या अन्नासाठी राखीव ठेवले आहे.
शेतीतील प्रत्येक पिकाला आर्थिक महत्त्व असताना स्वतःच्या उत्पन्नाचा विचार बाजूला ठेवून मुक्या जीवांच्या पोटाची काळजी घेण्याचा मांढरे यांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुपक्ष्यांना सहज खाद्य उपलब्ध व्हावे आणि त्यांची उपासमार टळावी, या उदात्त हेतूने त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून मांढरे कुटुंबीय सातत्याने पशुपक्ष्यांसाठी खाद्याची व्यवस्था करीत आहेत.
आजच्या काळात शेतीचा वाढता खर्च आणि पिकांच्या उत्पादनातून मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता एक एकर क्षेत्रातील पीक पशुपक्ष्यांसाठी राखून ठेवणे ही मोठी बाब आहे. मात्र, निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून मांढरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, निसर्गप्रेमी आणि पशुपक्षीप्रेमींकडून कौतुक होत आहे.
दुष्काळाच्या काळात माणसांच्या गरजांबरोबरच पशुपक्ष्यांच्या अन्न-पाण्याचाही विचार होणे आवश्यक आहे. नागरिकांनी घराच्या अंगणात, शेतात किंवा उपलब्ध जागेत पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवावीत. तसेच शक्य होईल त्या पद्धतीने त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था करावी.
-सुनील मांढरे





