प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण निश्चित होणार आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांची गती आणि तयारी आता चरमावस्थेत पोहोचली आहे. गाठीभेटी, बैठका आणि रणनीती आखणीच्या हालचाली सर्वत्र सुरू आहेत; मात्र आरक्षणाची अंतिम प्रतीक्षा असल्यामुळे अनेकांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेले नाहीत.गटातील दिग्गज नेतेमंडळींपासून पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या उमेदवारांपर्यंत सर्वच हालचाली वेगाने सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी इच्छुक उमेदवार गावोगावी नातेवाईक, मित्र व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन स्थानिक मतदार संघटन बळकट करत आहेत. अनेक उमेदवारांनी स्वतःसोबत कुटुंबातील सदस्यांना देखील सक्रिय केले आहे, जेणेकरून गट आरक्षित राहिल्यास घरातील सदस्यांमार्फत निवडणूक लढवता येईल.पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरळी कांचन या भागातील इच्छुक उमेदवारांवर आरक्षणाची अनिश्चितता टांगती तलवार आहे. गट आरक्षित झाल्यास आधीचा खर्च वाया जाईल, ही भीती काहींनी सुरुवात सावधगिरीने करण्यास भाग पाडली आहे. तथापि, सर्वसाधारण वातावरण निवडणुकीच्या रणधुमाळीकडे झुकलेले दिसते, गावोगावी चर्चा सुरू आहेत आणि मतदार आपापल्या प्रभागातील समीकरणांचा अंदाज घेत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढवतील की स्वतंत्र, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे काही उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. अनेक तरुण उमेदवार आपल्या संधीसाठी तयारी करत आहेत; कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून संधी मिळेल, या हेतूने सध्या बॅनरबाजीही सुरू आहे.शहरालगत हवेली तालुक्यात नागरीकरणाचे प्रश्न उभे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांवर येणारा ताण ही प्रमुख अडचण आहे. मोठ्या ग्रामपंचायती असूनही नागरी सुविधा पुरवण्यात अपयश, आर्थिक स्थिती, नियोजन आणि योग्य नेतृत्वाचा अभाव या समस्यांची कारणे आहेत. विकासाचे नियोजन न केल्यामुळे अनेक समस्या वर्षानुवर्षे उरल्या आहेत. नव्याने निवडून येणार्या प्रतिनिधींनी या समस्यांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. या गटांत आरक्षण पडणार? राज्य सरकारच्या नवीन आरक्षण आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेत सात गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, गुणवडी, नीरा वागज (ता. बारामती), गोपाळवाडी (ता. दौंड), लासुर्णे, वालचंदनगर (ता. इंदापूर) या सात गटात अनुसूचित जातीचे आरक्षण येऊ शकते. शिनोली (ता. आंबेगाव), बारव, डिंगोरे (ता. जुन्नर), वाडा (ता. खेड) आणि टाकवे बुद्रुक (ता. मावळ) या पाच गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण येण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच इच्छुक उमेदवार मैदानात उतरतील, आणि निवडणूक रंगणार आहे.