Pune District : आरक्षण सोडतीने इच्छुकांचे ‘पत्ते’ जाहीर; युती-आघाडीची वाट न पाहता ‘वन-मॅन आर्मी’ प्रचार सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या गट-गण आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्या मतदारसंघातील जागा राखीव झाली आणि कोणती खुली झाली, हे स्पष्ट झाल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही गट-गण राखीव झाल्याने काही इच्छुकांनी आपली तलवार म्यान केली आहे, तर अनेक जण उमेदवारीच्या दाव्यासह मैदानात उतरले आहेत. युती किंवा आघाडीची कोणतीही अधिकृत घोषणा नसतानाही, सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 गट आणि 13 पंचायत समित्यांमध्ये एकूण 146 गण आहेत. या सर्वच जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे.
ज्या मतदारसंघांमध्ये त्यांचे आरक्षण संपुष्टात आले आहे किंवा त्यांना अनुकूल आरक्षण पडलेले नाही, अशा इच्छुकांनी नाइलाजाने निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांना अनुकूल आरक्षण पडले आहे, अशा इच्छुकांनी कोणताही विलंब न लावता मतदारसंघातून ‘मलाच उमेदवारी मिळणार’ असा ठाम दावा करत प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील व्यक्तींच्या गाठीभेटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि छोटेखानी बैठका आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची वाट न पाहता, मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचार सुरू केला आहे.
सध्या सुरू असलेल्या या अनौपचारिक प्रचारामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. माजी सदस्य आणि प्रस्थापित नेते त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघातील आरक्षणाचे विश्लेषण करून, आता नवा मतदारसंघ शोधत आहेत किंवा कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत. नवखे आणि तरुण चेहरे या संधीचा फायदा घेण्यासाठी नवीन राजकीय समीकरणे जुळवत जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत, युती-आघाडीचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच इच्छुकांनी मतदारांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी शक्य तेवढा प्रचार सुरू केला आहे. आगामी काळात युती किंवा आघाडीची घोषणा झाल्यावर पक्षांतर्गत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
स्वयंघोषित उमेदवारी
सद्यस्थितीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांसारख्या प्रमुख राजकीय आघाड्यांची जिल्हा परिषद -पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना , भाजप, शिवसेना ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे अशा सर्वच प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांनी स्वयंघोषित उमेदवारी जाहीर करत आपल्यालाच तिकिट मिळणार असल्याचा दावा केला. त्यामुळे सोमवारपासूनच इच्छुकांनी मतदारसंघातील प्रतिष्ठीत व्यक्तींची भेट घेत निवडणुकीत साथ देण्याची हाक दिली आहे.





