पुणे | आरक्षण आमच्या हक्काचे…घोषणांनी दणाणले पुणे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे आणि हातात भगव्या पताका घेऊन मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीत सहभागी झाले. शहराच्या वेशीवर कात्रज येथे मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मराठे एकवटले होते.
सातारा रोड, स्वारगेट, बाजीराव रस्ता, शनिवारवाडा, जंगली महाराज रस्त्यावर ठिकठिकाणी जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, असा घोषणा देत मराठ्यांनी पुणे दणाणून सोडले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर आणि सांगलीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता फेरी रविवारी (दि. ११) सायंकाळी पुण्यात दाखल झाली. सातारा येथून सकाळी दहाच्या सुमारास ही शांतता फेरीने पुण्याकडे प्रस्थान केले. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नसरापुरसह खेड शिवापूर टोल नाक्यावर फुलांची उधळण आणि क्रेनच्या साह्याने मोठा हार घालण्यात आला.
शहराच्या वेशीवर कात्रज येथे मराठा सेवकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. जरांगे यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना, राजकारणातील वळूंना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आली आहे.
मराठ्यांची ताकद काय असते, ते दाखवून देऊ. माझी तब्येत बरी नसतानाही मोर्चात सहभागी झालो आहे. हे फक्त तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, असे जरांगे यांनी सांगितले.
सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेऊन बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून बर्वे चौकातून फेरी जंगली महाराज रस्त्याने छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे रॅलीचा समारोप झाला.
या वेळी चौकाचौकांत रॅलीचे जेसीबी आणि क्रेनच्या साह्याने फुलांची उधळण करून विविध संस्था, संघटना, राजकीय लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले. ठिकठिकाणी ढोल- ताशांचा गजर, भगवे झेंडे नाचवत संपूर्ण परिसरच भगवामय केला होता.
सकाळपासूनच उत्साह
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची रॅली सकाळी ११ वाजता पुण्यात येणार असल्याने सकाळपासूनच सारसबाग आणि डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात मराठा बांधव सहभागी झाले होते, तसेच ठिकठिकाणी स्वागतासाठी मराठा समाज उभा होता. रॅलीत ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या, तरीही भर पावसात मराठ्यांनी गर्दी करत रॅली यशस्वी केली.
महत्वाचे मुद्दे
– ठिकठिकाणी जंगी स्वागत; जल्लोषपूर्ण वातावरण
– शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून बांधव सहभागी
– ठिकठिकाणी पाणी, सरबत यांसह टोपी वाटपाची व्यवस्था
– शिस्तबद्ध आणि शांततेत रॅली पूर्ण
– मराठा आरक्षणाबाबत पोस्टर, बॅनरबाजी
– महिला व तरुणांचा लक्षणीय सहभाग



