शिरूर : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने सोडत आयोजित करण्यात आली आहे. ही सोडत 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक 1 येथे होणार आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश क्रमांक पसप-2/कावि/406/2025, दिनांक 17/04/2025 अन्वये अनुसूचित आणि बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोडतीसाठी माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि इतर मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पडेल. ग्रामविकास आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.