Badlapur case । Akshay Shinde : ‘फरार आरोपींना वाचवले जात आहे’; मृत अक्षय शिंदेच्या वकिलांचा आरोप

मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात असून पोलिसांकडून संस्थाचलकांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे देखील नष्ट केले असल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शाळेमध्ये घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनाने पोहोचवली नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी अद्याप फरार शाळा व्यवस्थापनातील आरोपींना पकलडे नाही, असा आरोप वकील कटारनवरे यांनी केला आहे. यावर अत्याचार पीडित कुटुंबाच्या वकिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पीडित कुटुंबाच्या वकील कविशा खन्ना म्हणाल्या, पीडित मुली अद्यापही शाळेत जाऊ शकल्या नाहीत. ज्यांच्यावर विश्वास ठेऊन तक्रार केली होती त्यांच्याकडून दिलासा मिळाला नाही. आता तर शाळा व्यवस्थापनातील आरोपी देखील फरार आहेत. त्यामुळे पीडित मुली अद्यापही शाळेत जाऊ शकलेल्या नाहीत.
उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
दरम्यान, लैंगिक आत्याचाराची घटना ज्या शाळेत झाली होती त्या शाळेचे संचालक व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.





