पुणे – “भारत’ या नावाचा आग्रह “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा आधीपासून आहे. भारताशिवाय अन्य कोणत्याच देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक “सभ्यता मूल्य’ आहे. भारताच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात भारताचे भारतत्त्व प्रकटीकरण होण्यासाठीच आम्ही काम करत आहोत, असे मत “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. संघाच्या पुण्यात आयोजित “अखिल भारतीय समन्वय’ बैठकीचा समारोप शनिवारी झाला. याविषयी डॉ. वैद्य यांनी माहिती दिली. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते. संघस्थापनेला 97 वर्षे पूर्ण झाली आहेत. शताब्दी वर्षाकडे याची वाटचाल सुरू झाली आहे. त्यादृष्टीने बैठकीत चर्चा झाली. प्रामुख्याने महिला समन्वयाचा मुद्दा चर्चिला गेला. महिला संमेलन भरवणे, विविध क्षेत्र, संस्थांच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या महिलांना एकत्र करणे, वक्ते, लेखिका, ग्रामपातळीवर कार्य करणाऱ्या महिलांना एकत्र आणणे हे कार्य ऑगस्टपासून सुरू केले आहे. जानेवारी 2024 पर्यंत 412 संमेलने होणार आहेत. त्यातील 12 प्रांतांत 73 संमेलने झाली. यात एक लाख 23 हजार महिलांचा सहभाग नोंदवला आहे. आणखीही संमेलन होणार आहेत. 2020 च्या तुलनेत 2023 मध्ये सुमारे वाढलेल्या संघशाखांची सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. मणिपूर स्थितीवर भाष्य मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि तेथील अशांत परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. ही स्थिती चिंताजनक असून यामध्ये तेथील सरकारने निर्णय घेणे अपेक्षित असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. दोन समाजांतील वाद मिटवण्यासाठी संघ कार्यकर्ते काम करत आहे, याकडे वैद्य यांनी लक्ष वेधले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना अनेक वर्षे समाजाने बाजूला ठेवले आहे. त्यांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले जावे ही संघाची भूमिका आहे. अयोध्या श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना मकर संक्रातीनंतर मुहूर्तावर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.