पुणे जिल्हा | पूर्व पुरंदरमधील पाणी योजनांसाठी साठवण तलावाची गरज

सासवड, (प्रतिनिधी) – पूर्व पुरंदरमध्ये दर तीन ते चार वर्षांनी निर्माण होणार्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
त्यावर कायमचा उपाय म्हणून जलजीवन योजनेतून पारगाव-माळशिरस प्रादेशिक योजनांवरील गावांसाठी जनाई उपसा जलसिंचन योजना आणि शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गावांसाठी वीर धरणातून पाणी आणून राजुरी आणि निळूंज येथे साठवण तलाव करून पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे.
या दोन्ही ठिकाणी गायरान जागा उपलब्ध करून साठवण तलाव करण्यात येतील. यासाठी दोन्ही योजनांतर्गत ग्रामपंचायतींनी साठवण तलावाच्या मागणीचे ग्रामसभेचा ठराव करून पंचायत समितीमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.
सासवड येथे सोमवारी (दि. 7) पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील कामांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते,
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, विठ्ठलराव मोकाशी यांसह जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य उपस्थित होते.
पारगाव-माळशिरस प्रादेशिक योजनेतील 14 गावांसाठी राजूरी येथे गायरानच्या जागेवर 250 कोटी लिटर क्षमतेचा तर शिवरी प्रादेशिक योजनांतर्गतच्या गावांसाठी निळूंज येथील गायरानात 131 कोटी लीटर क्षमतेचे साठवण तलाव होणार आहेत.
जेणेकरून टंचाई काळातील 2 ते 3 महिने नागरीकांना पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही., असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
आडाचीवाडी गावची योजना पूर्ण होऊन पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या तक्रारींचा वाचला पाढा
ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले जात नाही
एमजीपीचे ठेकेदार आणि ग्रामपंचायत समन्वय नाही
पाण्याच्या साठवण टाक्यांच्या जागांच्या अडचणी
जलवाहिन्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे
वाढीव प्रस्ताव करणे, विहिरी, विजजोड, योजनेची संथगतीने सुरू आहे
या केल्या सूचना
प्रत्येक वाडी-वस्तीवरील पाइपलाइन व वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून प्रत्येक घरात नळाने पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
विहीर स्त्रोत असणार्या ठिकाणी पाण्याची तपासणी करून जल शुद्धीकरण केंद्र उभारणे, सर्व पाइपलाइन नवीन करा, जलवाहिनी चांगल्या दर्जाच्या नसतील तर त्या बदल्या पाहिजेत.
योजना ठेकेदारांसाठी नाही, बोपगाव येथील कामाची चौकशी करावी अशा सूचना आमदार संजय जगताप तसेच उपस्थित सरपंच व पदाधिकार्यांनी केल्या.





