Saswad News – सासवड शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ व श्री जोगेश्वरी माता या पुरातन देवस्थानाच्या मालकीची गट क्रमांक ३०१ मधील आठ एकर ३ हेक्टर १९ आर, पोटखराबा २ आर बागायती इनाम जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टने केला आहे. ही जमीन ‘श्री भैरवनाथ देव’ नावावर असून याबाबतचे प्रकरण सध्या महसूल न्यायालयात प्रलंबित आहे. अतिक्रमणधारकांनी या जमिनीवरील ऊसतोड करून गाळपासाठी सोमेश्वर कारखाना येथे पाठविला आहे. त्यामुळे जोपर्यंत महसूल न्यायालयाकडून स्थगिती आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत श्री काळभैरवनाथ व इतर मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला आहे. देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वीही याच मुद्द्यावर आंदोलन केले होते. मात्र, संबंधित वहिवाटदार जमीन परत देण्यास तयार नसून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे व संबंधित कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने वारंवार तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. जमिनीवरील उसतोड, मशागत किंवा वहिवाट थांबवावी, यासाठी ट्रस्ट व भैरवकर कुटुंबीयांनी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, गावपाटील संग्राम जगताप, पुजारी मोहन भैरवकर, राजेंद्र भैरवकर, चैत्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, जयसिंग जगताप, रवींद्र जगताप उपस्थित होते.