देशात, राज्यात दडपशाहीचे राजकारण – खासदार सुळे

जेजुरीत व्यापार्यांशी साधला संवाद
जेजुरी – आज देशात आणि राज्यात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीत आम्ही माघे हटणार नाही, तुम्ही माघे हटायचे नाही. आपण लढू ही आणि जिंकू ही असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
जेजुरीत येथील पेशवे सभागृहात खासदार सुळे यांनी जेजुरीतील व्यापारी, लहानमोठे व्यावसायिक नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली होती. यावेळी विजय कोलते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अॅड. गौरी कुंजीर,
साधना दिडभाई, उद्योजक रवी जोशी, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, जयदीप बारभाई, एन. डी. जगताप, हेमंत सोनवणे, ईश्वर दरेकर यांच्यासह शहर व परिसरातील व्यापारी, डॉक्टर, व्यावसायिक, नागरिक तसेच पुणे-पंढरपूर महामार्ग बाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते
जेजुरीतील व्यापार्यांच्या वतीने माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केंद्रशासनाकडून अत्यंत जीवनावश्यक वस्तूंवर ही जीएसटी कर आकारला जात आहे. यात सर्वसामान्यांना मोठ्या फटका बसत आहे. केंद्रशासनाकडे याबाबत संसदेच्या माध्यमातून आपण आवाज उठवावा व सर्वानाच न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. याशिवाय जेजुरी नगरपालिकेत प्रशासकीय यंत्रणा असल्याने सर्व सामान्यांना अडचणीत येत आहेत. छोटीछोटी कामे ही अनेक हेलपाटे मारल्याशिवाय होत नाहीत.
मात्र रेल्वेचा विरोध
दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. जेजुरीच्या खंडोबाची दर सोमवती अमावस्येला कर्हा नदीवर स्नानासाठी पालखी सोहळा जात असतो. रेल्वे स्टेशनच्या परिसरातून सोहळा रेल्वेरूळ ओलांडून पलिकडे जावे लागते. देवसंस्थान विकास आराखड्यातून या पालखी मार्गाचे काम होत आहे; मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्या हद्दीत या मार्गाला विरोध करीत आहे.
शासन आपल्या दारी कशासाठी?
केंद्र शासन आणि राज्यशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे केवळ सत्ता टिकवायची आणि आणायची एवढेच काम सुरू आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाचा सर्वसामान्यांना काहीच फायदा झाला नाही. जे स्थानिक शासकीय कर्मचारी काम करीत आहेत. ते काम करायला शासन आपल्या दारी कशासाठी ? असा सवाल उपस्थित करीत खासदार सुळे यांनी केंद्रशासनावरही सडकून टीका केली.





