Nagar | शिक्षा होईल असा रिपोर्ट करा, पण त्रास देऊ नका

संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी नाराज असल्याच्या भावना तालुका पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्यक्त केल्या जात आहेत.
पेट्रोलिंग, इन्साफ, पोस्टमार्टम असे दोन दिवसांत काम करून सुद्धा पुन्हा काम सांगणे हे अन्यायकारक असल्याचे दुःख एका कर्मचाऱ्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे, माझी गैरहजेरी घेऊन मला जास्तीत-जास्त शिक्षा होईल, असा रिपोर्ट करा पण मला त्रास देऊ नका.
मी अन्याय सहन करणार नाही ,असे एका वयस्कर पोलिस कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या समूहावर टाकून कंपनी चालकावर नाराजी व्यक्त केली.
तालुका पोलीस ठाण्यात एक सहाय्यक फौजदार आहे. त्यांचे ऑपरेशन झाले आहे. ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात.
मात्र, तेथील कंपनी चालक काम करत असताना त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या ग्रुपवर केली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
त्या वयस्कर कर्मचाऱ्याने आपण केलेल्या कामांचा पाढाच ग्रुपवर टाकला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सकाळी पोस्टमार्टम करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडे प्रेत दिले.
त्यानंतर डिग्रस येथे जाऊन पंचनामा केला. त्यानंतर पुन्हा रात्रीचा गस्त टाकला. मात्र, कंपनी चालकाला काहीच काम नाही आणि इतर कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
त्यामुळे, “माझी गैरहजेरी घेऊन मला जास्तीत जास्त शिक्षा द्या, म्हणजे मला त्यांच्या जाचाची सवय होईल.” असे स्पष्टपणे त्यांनी ग्रुपवर टाकले आहे.
त्यामुळे कंपनी चालकाला काढून टाका अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, हा कर्मचारी पोलीस निरीक्षकांच्या मर्जीतील असल्याने यावर कुठली कारवाई होणार की नाही यावर पोलीस ठाण्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे.




