पुणे जिल्हा | काम टाळणाऱ्या शिक्षकेची बदली करा अन्यथा शाळा बंद करू

पळसदेव, (वार्ताहर) – उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पळसदेव परिसरातील बांडेवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेची बदली करा अन्यथा अन्यथा आम्ही शाळा बंद करू.
आम्ही आमची मुलं दुसऱ्या शाळेत पाठवू, असा आक्रमक पवित्रा येथील नागरिकांनी घेतल्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेत मोठा गोंधळ उडाला. तातडीने आम्हाला दुसरा बदली शिक्षक द्या, मगच शाळा सुरू करा, अशी मागणी या वेळी संतप्त पालकांनी केली.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसो राहीगुडे यांनी बोलताना संघितले की, संबंधित शिक्षिका शाळेत शिकवत नाही, शाळेत येऊन झोपतात, शाळेत आलेल्या नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाही.
या बाबत जाब विचारणा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना देखील उलट सुलट बोलल्या. त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करायचे नाही. तातडीने आम्हाला नवीन शिक्षक द्या अन्यथा आम्ही एकही पालक येथील शाळेत आमची मूल पाठवणार नसल्याच या वेळी त्यांनी सांगितले.
सध्या या शाळेत एकूण ३६ विद्यार्थी आहेत. या मुलांना शिकवण्यासाठी दोन शिक्षक आवश्यक आहे. तरी येथे नवीन शिक्षक द्यावा. आम्ही गेले एक वर्षांपासून या बाबत इंदापूर पंचायत समितीला पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांनी या बाबत कुठलीच कारवाई केली नाही.
आता तातडीने आमच्या शाळेवर नवीन शिक्षक द्या अन्यथा आम्ही पंचायत समिती कार्यालयात मुलांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बांडे यांनी दिला आहे. मागच्या वर्षी आमच्या मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे.
आता यापुढे ते आम्ही होऊ देणार नाही. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापुसो राहीगुडे, दीपक गाडेकर, अमोल बांडे, राजू मुलाणी, धनाजी डोंगरे, रवींद्र बांडे, सुजित काळे,सुरज गाडेकर, सुहास बांडे, रंगनाथ बांडे, हरिदास बांडे, धीरज जावळे, सचिन बांडे, सतीश बांडे, भाऊसाहेब कदम, नंदू कुंभार, महेंद्र बांडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी चौकशी करणार
या बाबत शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांच्याशी संपर्क साधला आता मी मंगळवारी स्वतः या शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा करेन. येथे नवीन शिक्षक देणेबाबत आवश्यक कारवाई करणार असल्याचं मत या वेळी त्यांनी व्यक्त केल.





