Nagar | मोहरम मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करा

नगर, (प्रतिनिधी) – आषाढी वारीसाठी पंढरपुर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रशासनामार्फत अनेक सोई-सुविधा गतवर्षांपासुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोहरम सणासाठी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील.
मोहरम सणा निमित्ताने मिरवणुक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करुन घेण्यात यावी. तसेच मार्गावर आवश्यक ती विद्युत व्यवस्था करण्यात यावी. मोबाईल शौचालय, पिण्याचे पाणी यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात होणारे सण, उत्सव शांततेमध्ये व आनंदात साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवत मोहरम सण शांततामय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मोहरम सणानिमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, मनपा उपायुक्त सौभव जोशी यांच्यासह शांतता समितीचे, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शांतताप्रिय उत्सव साजरा करणारा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक आहे. सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शिस्तबद्धरितीने व शांततेच्या वातावरणामध्ये सण साजरा करण्याची जबाबदारी उत्सव समितीमधील पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी आहे. सर्वांनी एकत्र येत हा सण अत्यंत आनंदाने व शांततेमध्ये साजरा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, मोहरम सण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततामय वातावरणात साजरा करण्यात यावा. मिरवणुकीदरम्यान डिजेचा वापर करण्यात येतो. ध्वनीप्रदुषणा बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. मर्यादेपेक्षा अधिक डिजेचा आवाज होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. मिरवणुकीमध्ये डिजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात यावा.
तसेच मिरवणुकीसाठी ठरवून दिलेल्या मार्गानेच मिरवणूक काढण्यात यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.





