Pune Gramin : नवासाला पावणारी निमदरीची कुलस्वामिनी रेणुका माता

ओझर : जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील कुलस्वामिनी रेणुका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. जुन्नर पासून साधारणतः ८ किलोमीटर तर नारायणगाव पासून १३ किलोमीटर अंतरावर मीना नदी तीरावर निसर्गरम्य वातावरणात रेणुका मातेचे मंदिर वसलेले आहे. नारात्रीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात.
निमदरी येथील देवस्थान मुळस्थान माहुरगड येथील आहे. तेथील एक गादी राजगुरुनगर तालुक्यातील कन्हेरसर या गावी आहे. तेथे जुन्नरमधील रहिवासी एरंडे, हे गृहस्थ देवीचे भक्त होते. मात्र त्यांचे वय जास्त झाल्याने जुन्नरवरून कन्हेरसर या ठिकाणी जाणे कठीण होऊ लागले. त्यांनी देवीची पुजाअर्चा करून विनंती केली, ‘माते मी आता वयोवृद्ध झाल्यामुळे पुजेकरीता इथपर्यंत येऊ शकत नाही. त्याच रात्री देवीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले, मी तुझ्यासंगती तुझ्या घरी येते परंतु तु मागे पाहू नको.
दुसऱ्या दिवशी एरंडे पुजेसाठी कन्हेरसर या ठिकाणी गेले व पुजा करून घरी येत असताना देवीस विनंती करून म्हटले, “मी जुन्नरला निघालो आहे. तेव्हा स्वप्नात सांगितल्याप्रमाणे तू माझ्या संगती चलावे”, व एरंडे जुन्नरला निघाले. रस्त्याने येत असताना तहान लागली म्हणून निमदरी येथे मिना नदीवर हातपाय धुवून पाणी पिले. त्यानंतर मागे वळून पाहिले, तर देवी त्यांना अंतरधान पावली.
त्यानंतर त्याच रात्री देवी परत त्यांच्या स्वप्नात आली आणि सांगितले की, “तु जेथे हातपाय धुतले तेथेच मी थांबले. आता मी येथून पुढे येणार नाही. तरी तू मीना नदीच्या काठावरती मंदिर बांधून माझी स्थापना कर. येणेप्रमाणे देवीचे मंदिर बांधून तिची स्थापना करण्यात आली. मंदिराची स्थापना झाल्यापासून येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट झाला. पूर्वी या ठिकाणी येण्याजाण्याची सोय नव्हती. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुल बांधण्यात येऊन येण्या-जाण्याचा प्रश्न मार्गी लागला.
सन १९९३ साली श्री क्षेत्र कुलस्वामिनी रेणुका माता देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. तेव्हापासून येथे नवरात्र उत्सव साजरा केला जात असून हे २२ वे वर्ष आहे. नवरात्र उत्सव कालखंडामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे ११ दिवस आयोजन असते, दिवसभरामध्ये देवीची आरती, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन हरिकीर्तन व समस्त ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
नवरात्रीमध्ये सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थान ट्रस्ट द्वारे येथे भाविकांसाठी राहण्याची सोय, आंघोळीसाठी गरम पाणी, गाडी पार्किंगची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते.
दरम्यान, या ठिकाणी अष्टमीला नवचंडी होमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी सात जोडप्यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्याकडून आकारण्यात आलेल्या देणगीतून ब्राह्मणांना दक्षिणा, होमासाठी लागणारे साहित्य तर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन मंदिर परिसरातील विकास कामे झाली आहेत तर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण जाधव, उपाध्यक्ष अनंत भगत, सचिव दिलीप भगत, उपसचिव ऋषिकेश भगत, खजिनदार सुनिल गाढवे, उपखजिनदार सुरज भगत, सदस्य सुर्यकांत भगत, विकास भगत, गोविंद भगत, विशाल भगत, पंकज भगत, प्रज्वल भगत, विक्रम भगत यांच्या माध्यमातून देवस्थानचा विकास आराखडा बनवण्यात आला असून जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी मंदिर विकास कामात भरीव योगदान देण्याचे देवस्थान ट्रस्टला आश्वासन दिले आहे..





