नागपूर – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न अनेक वर्ष रखडलेले असून शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के पडले आहेत. त्यामुळे त्यांना कोणतेही जमिनीचे व्यवहार अथवा कर्ज मिळत नाही. तर दुसरीकडे, ज्या विस्थापितांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळाल्या आहेत, त्या जमिनी त्यांना ताब्यात मिळत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना एक तर जमीन द्या नाहीतर जास्तीत जास्त मोबदला द्या, अशी मागणी बाबाची काळे यांनी विधानसभेत केली. औचित्त्याच्या मुद्द्यावर बोलताना काळे म्हणाले, खेड तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबाचे विभाजन झाले. कुटुंब मोठी झाली. त्यामुळे कमीत कमी जमीन राहिल्या त्यामुळे या संपूर्ण जमिनी त्याचबरोबर ज्या जमिनींना कॅनॉलचे पाणी मिळत नाही अशा सर्व जमिनीवरील बंदी काढून टाकून पुनर्वसनाचे शिक्के काढावेत. इंद्रायणीचे प्रदूषण वाढले… इंद्रायणी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना प्रदूषित पाण्याचा वापर करावा लागतो. इंद्रायणी नदीचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ रहावे यासाठी वरच्या भागात असणाऱ्या कंपन्यांना प्रदूषण थांबवण्याचे आदेश शासनाने द्यावेत अशी मागणी काळे यांनी केली.