Nagar | खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या निरीक्षकांना हटवा

शेवगाव, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांत शेअर ट्रेडींग घोटाळ्याने तसेच येथील वादग्रस्त पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे कार्य पद्धतीने शेवगाव पोलीस ठाणे सर्वत्र चर्चेत आहे.
येथील वकील संघाने त्यांचेविरुद्ध आंदोलनाचा इशारा देण्यास चार दिवस उलटले नाही तोच आज सोमवारी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्षांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचेकडे विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारे शेवगावचे पोलीस निरीक्षक भदाणे यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी करून आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे .
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कमलेश सिसोदिया यांच्या बरोबर आर्थिक तडजोड करून पोलीस निरीक्षक भदाणे यांनी गणेश हनवते व त्यांचा मुलगा रोहित हनवते यांच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे गणेश हनवते हे अपंग असून त्यांच्या दोन्ही पायात सळ्या आहेत. मुलगा रोहित याचे डोळ्यावर नगरच्या कांकरिया हॉस्पिटलमध्ये शस्त्रकि्या करण्यात आली आहे. तोही घरात पडून असताना सिसोदिया याच्या घराचा मोठ्या फाटकावरून घरात कसे घुसू शकतात ? केवळ आर्थिक तडजोडीतून हनवते पिता-पुत्रांविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला .
सिसोदिया बंधूंनी अनेक लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे तसेच मोठा परतावा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखविले. अनेकांना गंडा घातल्याने या प्रकरणी संदेश सिसोदिया यास अटक करण्यात आली आहे. हनवते यांनी सिसोदिया यांच्या खोट्या अमिषाला बळी पडून कुटुंबातील सर्व सदस्यांची मिळून आयुष्याची संचित केलेली वीस लाख रुपयाची पुंजी त्यांचेकडे गुंतवली.
परंतु अनेक दिवस उलटून गेल्याने सिसोदिया यांच्याकडे पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडून हनवते यांना उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. दिलेल्या पैशाची मागणी केली असता, पोलीस अधिकारी यांच्याशी आपले जवळचे संबंध आहेत, खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकील, अशाप्रकारे धमक्या दिल्या आहेत.
कमलेश सिसोदिया तसेच त्यांच्या भावांनी अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे अमिष दाखवून फसविल्याच्या अनेक घटना आहेत. तिघे भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून पोलीस निरीक्षक भदाणे त्यांना का पाठिशी घालतात, हा प्रश्न आहे. भदाणे यांचे निलंबन न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
आंदोलनाचा सिलसिला चालूच राहणार
या संदर्भात सावली दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष चांद शेख तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांनी देखील मंगळवारी (दि. १६ ) निवेदन देऊन आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले आहे.





