Gyanesh Kumar : पंतप्रधानांसह ज्ञानेश कुमार यांना हटवा.! काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान मागणी
निवडणूक आयोगाच्या प्रमुखांवर कथितरीत्या दबाव टाकल्याप्रकरणी नैतिक आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

Gyanesh Kumar – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्वरित पदावरून हटवण्याची मागणी केली. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रमुखांवर कथितरीत्या दबाव टाकल्याप्रकरणी नैतिक आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
काँग्रेस कार्यकारिणीच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत करताना खर्गे म्हणाले की, पक्ष कुमार आणि सरकारविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करेल; यामध्ये हा मुद्दा रस्त्यावर नेण्यासोबतच संसदमध्येही मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा प्रश्न उपस्थित केला जाईल.
मतदार याद्यांमधील प्रत्येक मोठ्या बदलाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आणि राजकीय पक्षांना मतदार याद्या व संबंधित माहिती सोप्या स्वरूपात व वेळेवर उपलब्ध करून देणे अशा पाच मागण्यांचा खर्गे यांनी उल्लेख केला. तसेच, जिथे गंभीर विसंगतींचे पुरावे आढळतील, तिथे स्वतंत्र आणि कालमर्यादित चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
या बैठकीदरम्यान काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी; लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी; तसेच पक्षाचे सरचिटणीस (संघटना) आणि खासदार के.सी. वेणुगोपाल उपस्थित होते.
खर्गे पुढे म्हणाले, आम्ही या मुद्द्याकडे केवळ निवडणूक जिंकण्याच्या किंवा हरण्याच्या लढाईच्या दृष्टीने पाहत नाही. निवडणुका येतात आणि जातात, सरकारे बदलतात; परंतु लोकशाही आणि संविधान हे शाश्वत असतात. लोकशाहीमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा सत्तेतील कोणताही नेता यांच्यापेक्षा सामान्य मतदार हाच सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो.
मतदार याद्या पारदर्शक असाव्यात, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष असावी, संस्था स्वतंत्र असाव्यात आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे मत सुरक्षित असावे. हीच संविधानाची भावना आहे आणि हाच लोकशाहीचा आत्मा आहे. काँग्रेस या लोकशाही जबाबदारीपासून कधीही मागे हटणार नाही.
इतिहास साक्षी आहे की, दहा वर्षांपूर्वी याच पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयाने भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली होती. आता, ते वोटबंदीच्या कारस्थानाद्वारे आपल्या भक्कम लोकशाहीचा नाश करत आहेत. अशा उपाययोजनांचा सर्वाधिक फटका गरीब, दलित, वंचित आणि शोषित घटकांना बसेल; कारण मत हे त्यांचे सर्वात शक्तिशाली शस्त्र असते.
मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांना त्याबाबत पूर्ण माहिती दिली जावी आणि त्यांना अपील करण्याची संधी मिळावी; तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि निर्णयांमध्ये पारदर्शकता असावी, जेणेकरून माहिती लपवली जात असल्याचा आरोप कोणत्याही पक्षाला करता येणार नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपले मत सुरक्षित आहे, असा विश्वास भारतातील मतदारांना वाटला पाहिजे. हा मुद्दा केवळ निवडणूक जिंकण्या-हारण्यापुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याशी संबंधित आहे.





