Pimpri : स्मशानभूमीची दूरवस्था, अत्यंविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

वडगाव मावळ : गरपंचायत हद्दीतील वैकुंठ स्मशानभूमीची दुरवस्था आता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. मृत्यूनंतरही नागरिकांची हेळसांड सुरूच असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोकाकुल कुटुंबियांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यातच पूर्ण होणे अपेक्षित असलेली निवारा शेडची दुरुस्ती अद्यापही संथ गतीने सुरू असून, पावसाळ्यात ही कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने नगरपंचायतीवर जोरदार हल्ला चढवण्यात आला असून, कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहर भाजपाध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने नगरपंचायतीकडे निवेदन सादर केले. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी वेळेवर कामे न होणे ही केवळ निष्काळजीपणाच नाही, तर नागरिकांच्या भावना दुखावण्यासारखा गंभीर प्रकार आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना निवारा नसल्यामुळे पावसात भिजावे लागत आहे. याशिवाय दशक्रिया विधी दरम्यान परिसरात प्रचंड दुर्गंधी असते. नियमित स्वच्छता होत नाही, त्यामुळे शेवाळ साचले असून काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना घसरून दुखापती झाल्याचेही त्यांनी सांगितले. दशक्रिया विधी होणाऱ्या मंडपाजवळच गाड्या उभ्या राहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी, पाणी, प्रकाश आणि निवाऱ्याचा अभाव म्हणजे प्रशासनाची अतिशय लाजीरवाणी अपयशाची साक्ष आहे, असे सांगत भाजपाने कामांना गती देऊन त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा वडगाव नगरपंचायत प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या शिष्टमंडळात माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी अध्यक्ष अनंता कुडे, युवक अध्यक्ष अतिश ढोरे, पवन दंडेल, शेखर वहिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुविधांचा अभाव
स्मशानभूमीत दहनशेडला चिमणीच नसल्यामुळे धुराचा त्रास आजूबाजूच्या परिसराला होतो. याशिवाय लाईट व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना नागरिकांना अंधारातच काम उरकावे लागते. त्यामुळे लाईट व्यवस्था तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली. पंचमुखी मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यामुळे अंतिम यात्रेच्या वेळी अडथळे निर्माण होतात. हे पार्किंग तातडीने हटवावे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाने मांडली.





