नवी दिल्ली -माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची उद्या (20 ऑगस्ट) जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी वडिलांच्या योगदानाची आठवण करून दिली. माझ्या वडिलांनी देशात माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांती घडवली.
त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम हाती घेणार आहोत. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ मी दरदिवशी त्यांच्या अविश्वसनीय योगदानातील एका कामगिरीचा उल्लेख करणार आहे, असे राहुल यांनी ट्विटरवरून म्हटले.
पहिल्या दिवशी माहिती-तंत्रज्ञानविषयक कामगिरी अधोरेखित करणारी 55 सेकंदांची एक क्लिप राहुल यांनी शेअर केली. त्यामुळे राजीव गांधी यांचे योगदान जनतेपर्यंत पोहचवण्याचा चंग कॉंग्रेस पक्षाने बांधल्याचे स्पष्ट झाले.