Religious Conversion Case : गाझियाबाद धर्मांतर प्रकरणी आरोपी शहानवाजला अटक

ठाणे – गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याप्रकरणी मुख्य आरोपी शहानवाज खान याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शहानवाजची आता मुंब्रा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंब्रा पोलिसांनी पोलीस स्थानकाचा बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
शहानवाज खान हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलीसांचे पथक अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या शहानवाजला ठाणे पोलीसांनी अलिबाग येथून अटक केली आहे.
पोलीसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे. गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
विशेष म्हणजे मोबाईल गेमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास 400 जणांचे धर्मांतर केल्याचा खुलासा गाझियाबाद सहाय्यक पोलिसांनी केला होता. तसेच या धर्मांतराचे कनेक्शन मुंब्रयाशी असल्याचे देखील यावेळी समोर आले होते. या मुलांचे ब्रेन वॉश करुन धर्मांतर केल्याचा धक्कादायक खुलासा गाझियाबाद पोलीसांनी केला होता.





