गाझियाबाद कोर्टातच न्यायाधीश आणि वकिलांमध्ये वाद; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Ghaziabad Court | उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हा न्यायालयात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सुनावणी सुरू असताना न्यायाधीश आणि वकील यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर कोर्ट रूममध्ये एकच गोंधळ सुरू झाला.
इतकेच काय तर पोलिसांना लाठीचार्ज करून न्यायाधीशांना बाहेर काढावे लागले. वकील नहर सिंह यादव आणि त्यांच्या साथीला असलेल्या वकिलांचा न्यायाधीशांशी वाद झाला. हा वाद एवढा पेटला की जिल्हा न्यायालयातील अन्य वकीलही तिथे हजर झाले. हा वाद वाढताच दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांना तिथे पाचारण करण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी गाझियाबाद जिल्हा न्यायालयात एका व्यक्तीच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. पण जिल्हा न्यायाधीश आणि वकील यांच्यात जामिनावरून बाचाबाची झाली, त्यानंतर मोठ्या संख्येने वकील तेथे जमले. त्यानंतर वकील न्यायाधीशांना सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि न्यायाधीशांना सुरक्षितपणे कोर्टरूममधून बाहेर काढले.
यावेळी नाहरसिंग यादव आणि अन्य एक वकील जखमी झाले. तसेच न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे. यानंतर कोर्टात अनेक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.





