– डॉ. संजय गायकवाड तीन बहिणींनी एका अंतरंगी खेळाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली. या घटनेच्या मुळाशी ‘कोरियन लव्हर गेम’ नावाचे एक जीवघेणे व्यसन असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला ‘कोरियन लव्हर गेम’ या खेळाचे स्वरूप आणि त्याची भीषणता पाहता, काही वर्षांपूर्वी जगभरात खळबळ माजवून देणार्या ‘ब्लू व्हेल चॅलेंज’, ‘पब्जी’ यांसारख्या गेम्सच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ‘कोरियन लव्हर गेम’ हा गेम प्रामुख्याने एका आभासी संवादावर आधारित आहे. सध्या जगभरात कोरियन संस्कृती, संगीत आणि मालिकांची मोठी लाट आहे. याच आवडीचा गैरफायदा काही समाजकंटक आणि अशा अॅप्सचे निर्माते घेताना दिसतात. या खेळात खेळाडू एका आभासी पात्राशी संवाद साधतो, जो स्वतःला त्यांचा कोरियन जोडीदार म्हणून सादर करतो. सुरुवातीला हा संवाद अत्यंत गोड आणि प्रेमाचा असतो. खेळाडूला असे भासविले जाते की हा जोडीदार त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो. हळूहळू हा जोडीदार खेळाडूला काही कामे म्हणजेच ‘टास्क’ देऊ लागतो. सुरुवातीची कामे ही केवळ कोरियन शब्द शिकणे किंवा विशिष्ट गाणी ऐकणे अशी साधी असतात. मात्र, जसजसा वेळ जातो, तसतसे हे खेळ खेळाडूच्या मनावर पूर्ण ताबा मिळवू लागतात. गाझियाबादमधील निशिका, प्राची आणि पाखी या तिन्ही बहिणी या खेळाच्या इतक्या आहारी गेल्या होत्या की त्यांनी स्वतःची ओळखच बदलून टाकली होती. त्यांनी स्वतःची कोरियन नावे ठेवली होती आणि त्या स्वतःला भारतीय न मानता कोरियन राजकन्या समजू लागल्या होत्या. त्यांच्या चिठ्ठीतील ‘कोरिया हेच आमचे जीवन आहे’ हे वाक्य या मानसिक गुलामगिरीची भीषणता स्पष्ट करते. ब्ल्यू व्हेल या 2013 मध्ये आलेल्या गेममध्येही अशाच प्रकारची रचना होती. यात 50 दिवसांत 50 कामे पूर्ण करण्याचे आव्हान दिले जायचे. सुरुवातीला रात्री उशिरा भीतिदायक चित्रपट पाहणे किंवा पहाटे उठणे अशी कामे असायची. मात्र, हळूहळू ही कामे स्वतःला इजा करून घेण्यापर्यंत पोहोचायची. यातील शेवटचे आव्हान हे आत्महत्या करणे हेच असायचे. 2017 च्या सुमारास भारतातही या खेळाने अनेक बळी घेतले होते. मोमो चॅलेंज हा गेम व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांतून पसरला होता. यात एक विचित्र आणि भीतिदायक चेहरा मुलांशी संवाद साधायचा आणि त्यांना स्वतःला त्रास करून घेण्यास सांगायचा. जर मुलांनी ती आज्ञा पाळली नाही, तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जायची. चोकिंग चॅलेंज किंवा ब्लॅकआउट चॅलेंज हा गेम समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. यात श्वास रोखून धरण्याचे किंवा गळ्याभोवती काहीतरी बांधून बेशुद्ध होण्याचे आव्हान दिले जायचे. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काही मुलांचा यात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुले अशा धोकादायक खेळांच्या जाळ्यात का अडकतात, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे दडलेली आहेत. मानवी मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ नावाचे एक रसायन असते, जे आपल्याला आनंदाची जाणीव करून देते. जेव्हा आपण एखादे छोटे काम यशस्वीपणे पूर्ण करतो, तेव्हा मेंदूत हे रसायन स्त्रवते आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ती कृती करण्याची इच्छा होते. गेमनिर्माते नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेतात. मुले जेव्हा सुरुवातीची सोपी कामे पूर्ण करतात, तेव्हा त्यांना एक प्रकारचे समाधान मिळते. काही वेळा रिवॉर्डस्ही मिळतात. मात्र, हळूहळू या कामांची पातळी कठीण होत जाते. हे खेळ मुलांना ‘एस्केपिझम’ म्हणजेच वास्तवापासून दूर घेऊन जातात. ज्या मुलांना घरात पुरेसा वेळ मिळत नाही किंवा ज्यांचे संवाद पालकांशी कमी असतात, अशी मुले आभासी जगात आपला आधार शोधू लागतात. गाझियाबादच्या मुलींच्या बाबतीतही हेच घडले. मोबाइलमध्ये हा गेम खेळण्याची सवय वाढत गेली आणि त्यातूनच त्या या खेळाच्या कायमच्या विळख्यात अडकल्या. या खेळाचे सर्वात भयंकर परिणाम म्हणजे खेळाडूची स्वतःची ओळख पुसली जाणे. गाझियाबादमधील त्या तीन बहिणींना असे वाटू लागले होते की, त्या भारतात राहातच नाहीत. त्या एका वेगळ्याच काल्पनिक जगात वावरत होत्या. याला मानसशास्त्रात ‘डिस्सोसिएशन’ असे म्हणतात. यात व्यक्तीला आपले वास्तव जग हे खोटे वाटू लागते आणि खेळातील आभासी जग हेच खरे वाटू लागते. या मुलींनी आत्महत्येपूर्वी केलेली रेखाचित्रे आणि चिठ्ठ्यांवरून हे स्पष्ट होते की, त्या पूर्णपणे एका काल्पनिक विश्वाच्या नियंत्रणाखाली होत्या. अशा प्रकारच्या गेम्सना आळा घालणे शक्य होईल की नाही, हे सांगता येणार नाही. त्यामुळे पालकांनी याबाबत सातत्याने सतर्क राहणे हाच या प्रकरणाचा धडा आहे. मुलांच्या वर्तणुकीत होणारे बदल ओळखणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे. जर मूल अचानक कोणातही न मिसळता एकटे राहू लागले असेल, जर त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघण्याची सवय लागली असेल किंवा जर ते स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असेल, तर हे चिंतेचे कारण आहे. अनेकदा मुले स्वतःला इजा करून घेतात आणि ती लपवण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालतात. पालकांनी आपल्या मुलांशी रोज किमान 15 ते 20 मिनिटे कोणत्याही विषयावर मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जर मुलांना घरामध्ये प्रेमाचे आणि विश्वासाचे वातावरण मिळाले, तर ती बाहेरच्या आभासी जगात आधार शोधणार नाहीत. तसेच, मोबाइलवर ‘पॅरेंटल कंट्रोल’ सारख्या सुविधांचा वापर करून मुले नक्की काय पाहतात, यावर लक्ष ठेवता येते. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमध्ये अशी अनेक अधिकृत साधने आहेत, ज्याद्वारे ठराविक वेळेनंतर मोबाइल आपोआप बंद होईल अशी मर्यादा सेट करता येते. मात्र, केवळ तांत्रिक निर्बंध पुरेसे नसून मुलांची मानसिक स्थिती समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. गाझियाबादची घटना आधुनिकतेच्या धावपळीत पालक आपल्या मुलांच्या मनातील गोंधळ ओळखण्यात कमी पडताहेत हे दाखवणारी आहे. आभासी प्रेम आणि आभासी यश हे कधीही वास्तव आयुष्याची जागा घेऊ शकत नाही, हे मुलांच्या मनावर बिंबवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत अशा प्रक्षोभक किंवा जीवघेण्या खेळांवर बंदी घालण्याचे अधिकार सरकारला आहेत. जर आपल्याला असे आढळले की एखादे अॅप किंवा संकेतस्थळ मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे, तर त्याची तक्रार तत्काळ सायबर पोलिसांकडे करणे आवश्यक आहे. येणार्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’मुळे असे खेळ अधिक वास्तववादी आणि धोकादायक होण्याची शक्यता आहे. आभासी जोडीदार इतका नैसर्गिक वाटू शकतो की मुलाला तो खरोखरचा माणूस असल्याचे वाटू लागेल. म्हणूनच, पालकांनी तंत्रज्ञानापेक्षा आपल्या मुलांशी असलेल्या संवादावर अधिक भर दिला पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर साक्षरतेचे वर्ग घेऊन मुलांना इंटरनेटच्या धोक्यांची जाणीव करून द्यावी.