नागरिकांना दिलासा.! दुध भेसळखोरांविरोधात CM शिंदेंनी घेतला टोकाचा निर्णय

CM Eknath Shinde – दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अन्नातील भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील प्राथमिक शालेय शिक्षणाचा दर्जा आणि दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत शिंदे बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ऍक्ट पेक्षा वेगळा कायदा राज्यात आणणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन आणि दुग्धविकास विभागांना त्याची नितांत गरज आहे असे ते म्हणाले.
दुधाच्या भेसळीविरुद्ध संयुक्त कारवाई करण्यासूचनाही त्यांनी केली, गृह विभाग त्याकामी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दूध उत्पादक शेतकरीही भेसळीमुळे त्रस्त असल्याचे ते म्हणाले.
शिंदे यांनी अन्नातील भेसळ हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगून त्याचा मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. भावी पिढीचे नुकसान होणार असून अन्न भेसळीमुळे अनेक जण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या तावडीत सापडतील, असे ते म्हणाले.
त्यामुळे अन्न भेसळ करणाऱ्यांविरुद्धची कारवाई एमपीडीए कायद्या अंतर्गत दिलेल्या तरतूदीपेक्षा कठोर असायला हवी, असे ते म्हणाले.





