खारघर उष्माघात प्रकरणी राज्य सरकारला दिलासा

मुंबई – खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या 14 श्रीसदस्यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे.
याप्रकरणी अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका बुधवारी हायकोर्टात निकाली काढली.
याप्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर पुढील योग्य ती कारावाई करण्यात येईल, अशी ग्वाही महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाला दिली.
याची दखल घेत तूर्तास या याचिकेची गरज नसल्यचे स्पष्ट करत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नीतीन जामदार आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
विशेष म्हणजे या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुरस्कारप्राप्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकच जबाबदार धरत त्यांच्यावरही फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली होती.
विरार येथील सामाजिक कार्यकर्ता शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती. मात्र ही केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका असल्याचे मत यापूर्वीच न्यायालयाने व्यक्त केले होते.





