नांदेड सिटीतील नागरिकांना दिलासा; पीटी ३ अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : नांदेड सिटीमधील नागारिकांना अद्यापही महापालिकेची मिळकतकराची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे, नांदेड सिटी मधील निवासी मिळकतींना ४० टक्के सवलतीचा लाभ देण्यासाठी पीटी ३ अर्ज भरण्यास ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमणार यांनी दिली.
महापालिकेकडून नांदेड सिटीतील नागारिकांना कर भरण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत दिली होती. मात्र, अद्यापही कर आकारणी बाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम तसेच ५० टक्के पेक्षा अधिक नागरिकांना बिलेच मिळलेली नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड सिटीमधील वेगवेगळया सोसायटया तसेच राजकीय प्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने मागील महिन्यापासून नांदेड सिटीमधील नागरिकांना मिळकतकराची बिले आकारण्यास सुरूवात केली आहे. मात्र, महापालिकेकडू नागरिकांचा अभिप्राय न घेताच कर आकारल्याने नागारिकांमध्ये नाराजी आहे. त्यातच, महापालिकेकडून कर आकारणी करताना नांदेड सिटीच पिण्याचे पाणी तसेच कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन करत असताना महापालिकेने या सेवांसाठीही कर आकारलेला आहे. तसेच तीन वर्षांची बिले दिली असून निवासी मिळकतींना ४० टक्के सवलतही देण्यात आलेली नाही.
ही सवलत देण्यासाठी ३१ जानेवारी पूर्वी पीटी ३ अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नांदेड सिटीतील वेगवेगळया शिष्टमंडळांनी महापालिकेची भेट पीटी ३ अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती.
अखेर या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून नागरीकांच्या मागणी प्रमाणे ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे डाॅ. खेमणार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच इतर मागण्याबाबत लवकरच विधी विभागाशी चर्चा करून मागण्याबाबत प्रशासनाचा अभिप्राय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सादर केला जाणार असल्याचे डाॅ. खेमणार यांनी स्पष्ट केले.





