मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तूर्तास दिलासा; 29 ऑगस्टपर्यंत कारवाई करता येणार नाही

Karanataka CM Siddaramaiah | कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर राज्यपालांच्या मान्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे पुनरावलोकन होईपर्यंत MUDA घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे आदेश दिले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यासंदर्भात खटला चालवण्याच्या दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती.
सिद्धरामय्या यांच्या याचिकेवर न्या. एम नागप्रसन्ना यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सिद्धरामय्या यांची तर महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना म्हणाले, ‘न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने आणि युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे संबंधित न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत आपले कामकाज तहकूब करावे.’
सिद्धरामय्या यांनी कथित MUDA घोटाळ्याच्या संदर्भात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या विरोधात चौकशीला मंजुरी देण्याच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाला काहीही तथ्य नसून त्यांचा आदेश बेकायदेशीर असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाची खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र सध्या उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आहे.
हेही वाचा:





