मुंबई – ‘टीआरपी’ गैरव्यवहार प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील सक्तीच्या कारवाईपासूनच्या हंगामी संरक्षणाची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने 5 मार्चपर्यंत वाढवली आहे. रिपब्लिक टिव्हीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलायर मिडीयाच्या अन्य कर्मचाऱ्यांनाही 5 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण मिळणार आहे. “टीआरपी’ गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाला एआरजी आऊटलायर मिडीयाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी तहकूब केल्यामुळे न्यायालयाने कारवाई स्थगितीला मुदतवाढ दिली आहे. पोलिसांच्या आरोपपत्राला आव्हान देताना एआरजी आऊटलायर मिडीयाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र काही नवीन कागदपत्रांच्या आधारे केले गेले आहे. ही कागदपत्रे कंपनीच्या याचिकेशी संबंधित नसल्याचा दावा राज्य सरकारचे वकील कपिल सिब्बल यांनी आज केला. या नवीन कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला अवधी आवश्यक आहे, असे ऍड. सिब्बल यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आणि पुढील सुनावणी पर्यंत गोस्वामी आणि इतरांना दिलेल्या हंगामी संरक्षणाची मुदत 5 मार्चपर्यंत वाढवली.